शिरुर (प्रतिनिधी) –
शिरूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला असून, अमरधाम स्मशानभूमीतील जुनी पत्रे शालेय पोषण आहाराच्या खोलीस वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालक व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्मशानभूमी नुतनीकरणावेळी काढण्यात आलेली धुराने काळी पडलेली पत्रे थेट विद्यार्थ्यांच्या पोषण आहार शिजवण्याच्या शेडसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या ठिकाणी सुमारे २०५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, याच खोलीत त्यांच्यासाठी आहार तयार केला जातो.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, संबंधित शाळेतील पोषण आहाराच्या खोलीवरील अमरधाम येथील काळवंडलेली पत्रे आज दिनांक २० मार्च २०२६ रोजी काढून टाकण्यात आल्याचे समजते. त्यामुळे ही बाब चुकीची असल्याचे स्पष्ट होत असून, प्रशासनाने अप्रत्यक्षरित्या चूक मान्य केल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणाची सत्यता उघड करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने खालील मुद्द्यांवर सविस्तर खुलासा करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे—
१) शिरुर अमरधाम येथील नुतनीकरणाचे काम कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले?
२) नुतनीकरणावेळी काढण्यात आलेल्या जुन्या पत्र्यांचा पंचनामा व नोंद आहे का?
३) या साहित्याची (जुनी पत्रे) विल्हेवाट कशी लावण्यात आली—लिलाव, विक्री किंवा अन्य प्रकारे?
४) पत्रे विक्री केली असल्यास त्याची पावती, रक्कम व खरेदीदाराची माहिती काय?
५) स्मशानभूमीतील पत्रे शालेय पोषण आहारासाठी वापरल्याबाबत कठोर चौकशी व कारवाई झाली आहे का?
६) पोषण आहारासाठी उभारलेल्या खोलीचा खर्च नेमका किती झाला व तो कोणाकडून करण्यात आला?
७) सदर खोली बांधणाऱ्या ठेकेदाराची सखोल चौकशी करण्यात येणार का?
तसेच, ही पत्रे संबंधित ठेकेदाराकडे नेमकी कोणत्या मार्गाने पोहोचली व नगरपरिषदेकडून या कामासाठी किती निधी अदा करण्यात आला आहे, याचाही खुलासा होणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
दरम्यान, लाटे आळी परिसरातील नगरपरिषद शाळेची नवीन इमारत तीन वर्षांपासून अपूर्ण असून, विद्यार्थी तात्पुरत्या जागेत शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे स्मशानभूमीतील पत्र्यांचा वापर झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“लहान मुलांच्या आरोग्याशी असा खेळ सहन केला जाणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
👉 नगरपरिषदेची अधिकृत भूमिका काय असेल आणि संबंधित ठेकेदारावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin