सिल्लोड प्रतिनिधी आकाश कोके : सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी या विजयानंतर पक्षांतर्गत नाराजीचा मोठा स्फोट पाहायला मिळत आहे. मंगळवारी अनिता बनकर यांची सभापतीपदी, तर भगवान आहेर यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. मात्र, या निवडीनंतर शहरात झळकलेल्या एका उपरोधिक बॅनरने आणि सोशल मीडियावरील राजीनाम्याच्या संकेतांनी संपूर्ण जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
निवड प्रक्रिया पूर्ण होताच शहरातील मुख्य भागात अज्ञात निष्ठावंत' कार्यकर्त्यांच्या नावाने लावण्यात आलेल्या एका फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फलकावर सत्तेच्या केंद्रीकरणाबाबत अत्यंत टोकदार सवाल उपस्थित करण्यात आले असून, पक्ष वाढवण्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डावलणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
"कार्यकर्ते फक्त झेंडेच उचलणार का? सरपंच तुम्हीच, तालुका अध्यक्ष तुम्हीच, जिल्हाध्यक्ष तुम्हीच आणि आता पंचायत समितीचे सभापतीही तुम्हीच... मग कट्टर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावायचे आणि पोलीस केसेस अंगावर घ्यायच्या का?" असा रोकठोक सवाल या बॅनरद्वारे विचारला आहे.
राजीनाम्याच्या संकेताने खळबळः
या सर्व घडामोडींत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. "विषय संपला... उद्या पंचायत समिती सदस्याचा राजीनामा देणार" अशा आशयाची पोस्ट त्यांनी केल्यामुळे राजकीय तर्कवितर्वांना वेग आला आहे. जरी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत वृषाली मिरकर यांनी पक्षशिस्त पाळली असली, तरी मिरकर दाम्पत्याची ही उघड नाराजी आगामी काळात सिल्लोडच्या राजकारणात नवीन समीकरणांची नांदी ठरू शकते. एकीकडे सत्तेचे समाधान असले, तरी दुसरीकडे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा संताप दूर करण्याचे मोठे आव्हान आता वरिष्ठ नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.





Social Plugin