Ticker

6/recent/ticker-posts

कळंबीच्या कडब्याची सोशल मीडियावर चर्चा.


ज्वारीचे समाधानकारक उत्पादन; जनावरांसाठी दहा फूट उंचीचा चारा

बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

मजुरांची टंचाई,वाढलेला खर्च, वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि सिंचनाच्या अडचणींमुळे अलीकडच्या काळात अनेक शेतकरी ज्वारी पिकाकडे पाठ फिरवत असल्याची स्थिती आहे. या अडचणींवर मात करत कळंबी (ता. खटाव) येथील शेतकरी शरद घाडगे यांनी घेतलेल्या ज्वारी पिकाचा दहा फूट उंच कडबा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

यंदा ज्वारीचे धान्य उत्पादन जेमतेम झाले असले, तरी जनावरांच्या चाऱ्यासाठी उंच आणि चांगला कडबा तयार झाला आहे. त्यामुळे घाडगे यांनी ज्वारीचा कडबा विक्रीसाठी काढला असून, शेकडा सुमारे चार  ते पाच हजार रुपये दराची अपेक्षा व्यक्त केली आहे. उंच व दाट कडबा पाहून परिसरातील शेतकरीही त्यांच्या शेताला भेट देत आहेत. या कडब्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

खटाव परिसरातील बहुतांश शेती कोरडवाहू स्वरूपाची असल्याने ज्वारी पिकाला सात ते आठ वेळा पाणी द्यावे लागते. वाढता खर्च, मजुरांची टंचाई आणि वन्यप्राण्यांचा उपद्रव यामुळे अनेक शेतकरी ज्वारी पिकापासून दूर जात असले, तरी कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ज्वारीशिवाय फारसा पर्याय नसल्याची परिस्थिती आहे. अशा अनेक अडचणींवर मात करत घेतलेल्या ज्वारी पिकातील उंच व भरघोस कडब्यामुळे शरद घाडगे यांच्या मेहनतीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगत आहे.              

    ज्वारी शेतीसमोरील मजूर टंचाई ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यातच अलीकडे रानडुक्कर आणि वनगाय यांच्या वाढत्या वावरामुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाच ते सहा शेतकऱ्यांना मिळून पिकाच्या रक्षणासाठी खडा पहारा द्यावा लागतो. त्याचबरोबर पाखरांपासूनही पिकाचे संरक्षण करावे लागते. -शरद घाडगे, शेतकरी, कळंबी.