Ticker

6/recent/ticker-posts

दौंड तालुक्यात प्रशासनाचा 'जनता दरबार'; यवत आणि पाटस येथे 'महाराजस्व समाधान शिबिर'.



पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

दौंड:तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि प्रलंबित कामांना गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दौंड तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले असून, याद्वारे विविध शासकीय सेवा आता थेट नागरिकांच्या दारी उपलब्ध होणार आहेत. दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरामुळे नागरिकांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यापासून मोठी मुक्ती मिळणार आहे. शिबिराचे पहिले आयोजन ७ मार्च २०२६ रोजी यवत येथील पालखी सभामंडपात (काळभैरव मंदिर परिसर), तर दुसरे शिबिर १४ मार्च २०२६ रोजी पाटस येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

​या समाधान शिबिरामध्ये महसूल विभागाच्या प्रलंबित फेरफार नोंदी, 'जिवंत' ७/१२ मोहीम, ७/१२ अद्ययावतीकरण, पी.एम. किसान योजना, केंद्र सरकारची 'अॅग्रिस्टॅक' योजना, तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न व जातीचे दाखले यांसारख्या सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत. यासोबतच नवीन अकृषक (NA) धोरणाची माहिती, तुकडेबंदी संदर्भातील कार्यवाही आणि भोगवटा वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याबाबतही विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शासकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.