Ticker

6/recent/ticker-posts

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राजवीर जाधव यशस्वी; राज्यात दुसरा तर देशात सतरावा क्रमांक.



बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

 पुसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भवानीनगर, पुसेगाव या शाळेचा विद्यार्थी राजवीर चंद्रशेखर जाधव याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. राजवीरने 300 पैकी तब्बल 290 गुण मिळवत संपूर्ण देशात सतरावा क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक आणि सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ग्रामीण भागातील साध्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून पुढे येत राजवीरने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तो चंद्रशेखर रामचंद्र जाधव यांचा सुपुत्र असून आल्याचे प्रसिद्ध व्यापारी रणधीर रामचंद्र जाधव यांचा पुतण्या आहे. कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा आणि प्रेरणा यामुळे त्याला अभ्यासात सातत्य राखता आले.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे राजवीरने नमूद केले.  तसेच इतर शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्याला परीक्षेसाठी सक्षम बनवले. नियोजनबद्ध अभ्यास, नियमित सराव चाचण्या आणि शिस्तबद्ध दिनक्रम यामुळे राजवीरने उत्कृष्ट गुणांची कमाई केली.

राजवीरच्या या यशाबद्दल सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त गौरव  जाधव, माजी चेअरमन जगनशेठ जाधव, सावंत सर, जतकर सर, सुरेश शेठ जाधव, शहाजी जाधव, विघ्नेश जाधव, सौरभ जाधव, राम जाधव, आचार्य धीरज जाधव, विठ्ठल तोडकर, शाळेतील शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राजवीरच्या या यशामुळे पुसेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.