पपईच्या बागेत कलिंगडाची लागवड; शेतकऱ्याला चांगले उत्पन्न
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] :
गादेवाडी (ता. खटाव) येथील प्रगतशील शेतकरी बाबूराव जाधव यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत शेतीतून उल्लेखनीय उत्पन्न मिळवले आहे. पारंपरिक पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोगांची कास धरत उत्पन्नवाढीचा नवा मार्ग शोधला.जाधव यांनी आपल्या तीस गुंठे पपई बागेत आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागवड केली. पपईच्या झाडांमधील मोकळ्या जागेचा योग्य वापर करत त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कलिंगड पीक घेतले. योग्य खत व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि कीडनियंत्रण यावर विशेष लक्ष दिल्याने उत्पादन समाधानकारक आले. बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य वेळी माल विक्रीस काढल्यामुळे चांगला दर मिळाला.
विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी थेट शेतावर येऊन कलिंगडाची खरेदी केल्याने वाहतूक व इतर खर्चात बचत झाली. परिणामी, निव्वळ उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. अलीकडच्या काळात पारंपरिक पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी शेतीत विविध पिकांचे प्रयोग सुरू केले.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी जास्वंदीची लागवड केली होती. त्या पिकातूनही त्यांना आर्थिक फायदा झाला. आंतरपीक पद्धतीचा प्रभावी वापर, बाजारपेठेचा अचूक अंदाज आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे बाबूराव जाधव हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे इतर शेतकऱ्यांनाही नव्या पद्धतीने शेती करण्याची दिशा मिळत आहे.





Social Plugin