Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम.




दिनकर बोरकर/प्रतिनिधी 

दिनांक - 9 मार्च 2026

सायगाव,खेड : ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने युवामित्र, टाटा ट्रस्ट आणि टाटा ऑटोकॉम यांच्या माध्यमातून मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (MHM) उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

खेड तालुक्यातील सायगाव, कोहिंडे बुद्रुक व औदर या गावांमध्ये हे कार्यक्रम उत्साहात पार पडले. युवामित्रच्या क्लस्टर कोर्डिनेटर अस्मिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली CRP वैजयंता रौंधळ, कोमल बोरकर व हर्षदा कदम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

जागतिक महिला दिन निमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना आणि किशोरींना मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्त्व, योग्य सॅनिटरी पॅडचा वापर, तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान तज्ञांनी मासिक पाळीशी संबंधित गैरसमज दूर करत स्वच्छता राखल्यास विविध आजारांपासून बचाव करता येतो, असे सांगितले. तसेच सॅनिटरी पॅडचे योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याबाबतही माहिती देण्यात आली.

या उपक्रमात स्थानिक महिलांनी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले आणि महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.

हा कार्यक्रम महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजात मासिक पाळीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.