Ticker

6/recent/ticker-posts

नगरपंचायत सभागृहात नेमकं चालतंय तरी काय? पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर; अविनाश ब्राम्हणवाडे यांची व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी मागणी.



सभागृहातील कामकाज जनतेसमोर स्पष्ट व्हावे; अधिकृत ऑडिओ-व्हिज्युअल नोंदीची गरज

प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर 

नगरपंचायत सभागृहातील कामकाज पारदर्शक, उत्तरदायी आणि जनतेसमोर स्पष्ट व्हावे, या उद्देशाने स्वीकृत नगरसेवक अविनाश सदाशिवराव ब्राम्हणवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांकडे सभेच्या अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंगची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी लेखी निवेदन सादर करत सभागृहातील चर्चांची अचूक नोंद राहणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.

नगरपंचायत सभांमध्ये जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाते, विकासकामांवर निर्णय घेतले जातात तसेच निधी, योजना आणि प्रशासकीय बाबींवर भूमिका मांडल्या जातात. अशा परिस्थितीत केवळ कागदी इतिवृत्तांवर अवलंबून राहणे अपुरे ठरत असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी नमूद केले. जर संपूर्ण कामकाजाची अधिकृत ऑडिओ-व्हिज्युअल नोंद ठेवली गेली, तर चर्चेतील अचूकता वाढेल, प्रशासनाची जबाबदारी निश्चित होईल आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची भूमिका जनतेसमोर स्पष्टपणे मांडली जाईल, असा त्यांचा ठाम युक्तिवाद आहे.

यासोबतच, प्रशासनाने अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था तात्काळ करावी, अन्यथा नियमांच्या अधीन राहून वैयक्तिक स्तरावर रेकॉर्डिंग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. “सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत असेल, तर त्या चर्चेची नोंद कॅमेऱ्यात का नसावी?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.

दरम्यान, या मागणीमुळे नगरपंचायत वर्तुळात चर्चेला उधाण आले असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभागृहातील कामकाज अधिक खुले, शिस्तबद्ध आणि उत्तरदायी करण्याच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.