प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव, दि. 17 मार्च – नगर पंचायत नांदगाव हद्दीत मासे विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना व मच्छी विक्रेत्यांना सध्या स्वच्छ व नियोजित बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेविका छकुली राहुल गेडाम यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक व स्वच्छ फिश मार्केट उभारण्याचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
सध्या अनेक विक्रेते रस्त्याच्या कडेला किंवा तात्पुरत्या ठिकाणी मासे विक्री करत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगर पंचायत क्षेत्रात सुसज्ज फिश मार्केट उभारण्याची गरज असल्याचे नगरसेविकेने नमूद केले आहे.
प्रस्तावित फिश मार्केटमध्ये मासे विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल, स्वच्छ पाणी व ड्रेनेज व्यवस्था, बर्फ साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज किंवा आईस बॉक्स सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी योग्य जागा अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा प्रकल्प राबविण्यात आल्यास स्थानिक मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करता येईल तसेच नागरिकांना स्वच्छ व ताजे मासे उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत नगर पंचायत सभेत प्रस्ताव मंजूर करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.





Social Plugin