Ticker

6/recent/ticker-posts

अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा कडक हातोडा; MRTP अंतर्गत गुन्हा दाखल झाला, यापुढे शासकीय व मालकी जागांवरील बेकायदेशीर बांधकामांवर गुन्हे दाखल



मार्च २०२६

पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

बोईसर (ता. पालघर) – शासकीय तसेच मालकी जागांवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंडळ अधिकारी बोईसर विजय गुंडकर यांनी दिला आहे. यापुढे कोणीही बेकायदेशीर बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 (MRTP) च्या कलम 52 अन्वये गुन्हा दाखल करता येईल तसेच संबंधित बांधकाम तात्काळ निष्काशीत (पाडण्यात) केले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

मौजे सरावली, ता. पालघर येथील शासकीय जागेवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात प्रशासनाने कारवाई करत संबंधितांविरुद्ध MRTP कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासनाने यापुढे अशा प्रकारांना अजिबात पाठीशी घालणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

नागरिकांसाठी इशारा देताना मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी सांगितले की, “शासकीय तसेच खाजगी (मालकी) जागेवर कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास ते तात्काळ निष्काशीत करण्यात येईल आणि संबंधितांवर MRTP कायद्याच्या कलम 52 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे व कोणतेही बेकायदेशीर बांधकाम करू नये.”

तसेच विजय गुंडकर यांनी पुढे नमूद केले की, प्रशासनाचे उद्दिष्ट केवळ कारवाई करणे नसून परिसरातील शिस्तबद्ध व कायदेशीर विकास सुनिश्चित करणे हे आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घ्याव्यात, अन्यथा त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात.

यासोबतच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, कुठेही अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास त्याची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी. अशा प्रकरणांवर त्वरित कारवाई करून शासकीय जागांचे संरक्षण करण्यात येईल. विजय गुंडकर यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असून कायद्याचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचा स्पष्ट संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.