प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कंझरा–मांजरी–मसाला–बडनेरा–चांदूर रेल्वे तसेच अकोला व नागपूर मार्गाला जोडणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता चाळण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी व विद्यार्थी या मार्गाचा वापर करत असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. परिणामी, या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना याच मार्गावरून ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निवेदने देऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. निधीअभावी काम रखडल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





Social Plugin