३० मतदारांचा वॉर्ड आणि तलाठ्यांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा
पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे
दौंड: तालुक्यातील बिरोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या आगामी प्रभाग रचनेवरून महसूल विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. बिरोबाचीवाडी व पाटस या दोन गावांसाठी एकच ग्राम महसूल अधिकारी असून त्यांचे कार्यालय पाटस या ठिकाणी आहे संबंधित ग्राम महसूल अधिकारी कर्तव्यात कसूर करत गावाला साधी भेटही न देता, तलाठी कार्यालयात बसूनच प्रभाग रचनेचा नकाशा तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांनी या ‘ऑफिस रिपोर्ट’ला तीव्र विरोध दर्शवला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या नवीन रचनेत वॉर्ड क्रमांक ३ ची रचना केवळ ३० ते ३५ मतदारांसाठी मर्यादित ठेवून विशिष्ट सोयीसाठी हा घाट घातल्याचा आरोप होत आहे. बिरोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रभाग रचनेबाबत ग्रामस्थांनी जाब विचारला असता, संबंधित बीएलओ आणि तलाठी यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर केले आहेत. "हे काम माझे नाही, माझ्याकडे जुना नकाशा उपलब्ध नाही," अशी कबुली बीएलओ यांनी दिली आहे, तर तलाठ्यांनी ही माहिती बीएलओकडून मिळाल्याचे सांगत आपण प्रत्यक्ष गावात जाऊन सीमांकन केले नसल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. एका त्रयस्थ व्यक्तीच्या सांगण्यावरून आणि कागदोपत्री जुळवाजुळव करून तयार केलेल्या या आराखड्यामुळे वॉर्ड १ आणि २ मध्ये मतदानाचा मोठा भार पडला आहे, तर वॉर्ड ३ मध्ये अवघ्या ३०-३५ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते जयदीप रणजीत गावडे,मा.ग्रा.सदस्य नागेश दादासो म्हस्के,मा.ग्रा.सदस्य महेश मोहन खारतुडे,मा.सरपंच बाळासाहेब नानासो खारतुडे व इतर ग्रामस्थांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, कार्यालयात बसून नकाशा बनवणाऱ्या संबंधित तलाठ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने ही सदोष प्रभाग रचना तात्काळ रद्द करून जुनी वॉर्ड रचना कायम ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे. आगामी २१ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत उपविभागीय अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तलाठ्यांच्या या मनमानी कारभारावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin