Ticker

6/recent/ticker-posts

बंदुकीच्या धाकावर संसार; पतीने पत्नीला पळवले



नाशिक प्रतिनिधी जकीया शेख 

ज्या हातांनी संसाराची शपथ घेतली, त्याच हातांनी बंदुकीच्या धाकावर पत्नीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना सातपूर परिसरात घडली आहे. ‘अक्षय्य तृतीया’ सणाच्या तोंडावर घडलेल्या या ‘क्षय’ कृत्याने खळबळ उडाली असून, नाशिक पोलिसांची पथके आता ठाणे आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित अक्षय युवराज पाटील (मूळ रा. सातपूर, सध्या रा. बदलापूर वेस्ट, जि. ठाणे) याचे सातपूर येथील एका तरुणीशी प्रेम होते. दोघांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सुखाचा वाटणारा हा संसार अक्षयच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे विस्कळीत झाला. अक्षयने पुन्हा गुन्हेगारीत पाऊल ठेवल्याचे लक्षात येताच, पत्नीने त्याला सुधारण्याची संधी दिली. मात्र, त्याच्या वर्तनात बदल न झाल्याने अखेर पत्नीने संसारातून तात्पुरता काडीमोड घेत सातपूर येथील माहेरी (श्रमिकनगर) राहणे पसंत केले.

पत्नीने साथ सोडल्याचा राग अक्षयच्या मनात होता. त्यातून तो, मध्यरात्री थेट बदलापूरहून नाशिकला आला. सिद्धी संकुल अपार्टमेंटमधील सासुरवाडीत शिरुन त्याने गोंधळ घातला. यावरच न थांबता रिव्हॉल्व्हरसारख्या हत्याराचा धाक दाखवत पत्नीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले आणि तिचे अपहरण करून पळ काढला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सासूची फिर्याद अन् शोध

याप्रकरणी पीडितेची आई वैशाली बाळकृष्ण आहिरे (५२) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेशपुरी बुवा आणि त्यांचे विशेष पथक संशयिताचा माग काढण्यासाठी तातडीने ठाणे आणि मुंबई परिसरात रखाना झाले आहे.

रिव्हॉल्व्हर की गावठी कट्टा ?

अक्षयने दाखवलेले शस्त्र नेमके कोणते होते, याबाबत अद्याप संभ्रम आहे. ते खरे रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टा की एअरगन हे त्याच्या अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. अक्षयवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, सणासुदीच्या काळात त्याने केलेले हे ‘क्षय्य’ कृत्य त्याच्यासाठी संकट ठरले आहे.