Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावचे सुपुत्र रवींद्र कदम ठरले 'सितारा आयकॉन'



पुण्यात देसाईंच्या हस्ते वितरण; गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात यश

बुध   दि . [ प्रकाश राजेघाटगे ]  

समाजात शांतता निर्माण करण्याबरोबरच विविध गुन्ह्यांतील आरोपींवर कठोर कारवाई  करुन समाजात शांतता निर्माण करणाऱ्यात यशस्वी ठरलेल्या पुसेगावचे सुपुत्र , वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांना 'सितारा आयकॉन २०२६' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भूमाता ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा  व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी सितारा सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्री. कदम हे पुसेगाव (ता. खटाव) येथील रहिवाशी आहेत. १५ डिसेंबर २०२५ रोजी स्थापन झालेल्या लक्ष्मीनगर (पुणे) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करण्याचा पहिला मान रवींद्र कदम यांना मिळाला. अतिशय खडतर परिस्थितीतून श्री. कदम यांनी या पदापर्यंत झेप‌ घेतली आहे. लक्ष्मीनगर पोलीस ठाणेअंतर्गत सुमारे तीन लाख लोकसंख्या आहे. या भागामध्ये बेकायदेशीर दारू बनवणे व दारू गुत्यांचे प्रमाण जास्त होते. साधारण साडेतीन हजार रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. सुमारे २० जणांना तडीपार करण्यात आले. मोक्कातील आरोपीही अटक केले गेले. टपर्यांवर कारवाई करून गुटखा विक्री बंद करण्यात आली. कोयता गॅंगवरही कठोर कारवाई केली गेली. वाहनांच्या काचा फोडणाऱ्या संशयिताला अटक करून त्याच्यासह गंभीर गुन्ह्यातील संशयितांची धिंड काढण्यात आली. लाखो रुपयांचा विदेशी मद्यविक्रीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर धडक कारवाई केली गेली. या सर्व कारवायांमुळे लोकांमध्ये विश्वास वाढू लागल्याने आता ते पुढाकार घेऊन गुन्हेगारीबाबत पोलीस ठाण्यात येऊन माहिती देत आहेत. 

*आज्जीला मिळवून दिले हक्काचे घर...*

लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या आज्जीवर तिच्याच सूनेने घराबाहेर काढून गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करत असताना संबंधित आज्जीवर अन्याय झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे श्री. कदम यांनी कोर्टात दाद मागून या आज्जीला हक्काचे घर मिळवून दिले. त्याचबरोबर  तिला दत्तक घेऊन तिच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी घेत त्याचा खर्च पोलीस ठाण्यातर्फे केला जात आहे. 

.गेल्या एकोणतीस वर्षापासून पोलिस सेवेत कार्य करत असताना अनेक माता-भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न करून विविध भागात काम करताना वाढलेली गुन्हेगारी कशा पद्धतीने रोखता येईल यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे. खाकी वर्दीत मी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देत आल्याने हा माझा सन्मान नसून माझ्या माता, भगिनीसह माझ्या बांधवांचा असल्याने या पुरस्काराने मी भारावून गेलो असून हा पुरस्कार मी माझ्या जनतेला समर्पित करत आहे.- रविंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन