Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक: दौंडमध्ये सरकारी मालमत्तेचे खासगीकरण?

 










सिमेंट कंपन्यांच्या बेकायदेशीर जाहिरातींनी जलकुंभ रंगले; प्रशासनाकडून तक्रार ‘Auto Closed’

पाटस प्रतिनिधी:गणेश गावडे

दौंड:दौंड तालुक्यातील बेटवाडी आणि सोनवडी परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शासकीय पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांवर खाजगी सिमेंट कंपन्यांनी बेकायदेशीरपणे जाहिराती रंगवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या सार्वजनिक मालमत्तेवर 'Adani Cement', 'ACC Limited' आणि 'Penna Cement' यांसारख्या कंपन्यांचे फलक विनापरवाना लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या विद्रुपीकरणाबाबत ५ एप्रिल २०२६ रोजीच्या प्रत्यक्ष फोटोग्राफिक पुराव्यात 'Adani Cement' ची जाहिरात स्पष्टपणे दिसून येत आहे.  

​या प्रकरणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दौंड शहर अध्यक्ष श्री. गणेश मनोहर जगताप यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी 'आपले सरकार' पोर्टलवर अधिकृत तक्रार (क्र. DEP/RDDE/PUNE/2025/113) दाखल केली होती. मात्र, वर्षभर उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता ही तक्रार प्रणालीमध्ये "Auto Closed" केली आहे. तक्रार प्रलंबित असताना ती बंद करणे हा प्रशासनाचा निष्काळजीपणा असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

​ग्रामपंचायत गार (ता. दौंड) यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात मौजे बेटवाडी येथील दोन साठवण टाक्यांवर 'विनापरवाना' जाहिरात रंगवण्यात आल्याची लेखी कबुली दिली आहे. अहवालात 'बिरला A1 सिमेंट' कंपनीचे नाव नमूद करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष जागी इतर कंपन्यांच्या जाहिरातीही सुरूच आहेत. हे कृत्य 'महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियम, १९९५' अंतर्गत फौजदारी गुन्हा असूनही प्रशासन कोणत्याही कंपनीच्या दबावाखाली काम करत आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. सर्व बेकायदेशीर जाहिराती तात्काळ हटवून संबंधित कंपन्या व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. गणेश जगताप यांनी दिला आहे. 

"सरकारी मालमत्तेवर खाजगी सिमेंट कंपन्यांनी बेकायदेशीरपणे जाहिराती रंगवणे हा 'मालमत्ता विद्रुपीकरण कायद्या'नुसार गंभीर गुन्हा आहे. आम्ही २९ एप्रिल २०२५ रोजी याविरोधात पुराव्यासह तक्रार केली होती, मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता ती 'Auto Closed' केली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ग्रामपंचायतीने स्वतः या जाहिराती 'विनापरवाना' असल्याचे मान्य केले आहे. प्रशासनाने या जाहिराती तात्काळ हटवून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आम्ही जनआंदोलन छेडू."  -श्री. गणेश मनोहर जगताप(अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, दौंड शहर)