Ticker

6/recent/ticker-posts

​दौंड तालुक्यातील दहिटणे परिसरात नरभक्षक बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण



पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

दौंड:दौंड तालुक्यातील दहिटणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तो आता भरदिवसाही उघडपणे फिरताना दिसत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. येथील शेतकरी गणेश पिलाने हे आपल्या शेतात नांगरणीचे काम करत असताना, त्यांना अचानक समोरून बिबट्या येताना दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखून या बिबट्याचे व्हिडिओ चित्रण केले असून, हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

 विशेष म्हणजे, याच परिसरात गेल्या वर्षी एका नरभक्षक बिबट्याने एका लहान मुलाला उचलून नेले होते, त्यामुळे सध्या वावरत असलेला बिबट्या तोच असावा, अशी दाट शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. बिबट्याचा संचार दिवसाढवळ्या सुरू असूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी दहिटणे परिसरातील रहिवाशांनी केली आहे.