Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग





कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

बदनापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या महोत्सवात दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित मातोश्री रमाई समाजकार्य महाविद्यालय, बदनापूर येथील बी.एस.डब्ल्यू. व एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी, चित्रकला, भारतीय शास्त्रीय नृत्य यांसह विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली बौद्धिक क्षमता, कलागुण व सर्जनशीलतेचे प्रभावी प्रदर्शन केले. विविध स्पर्धांमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्यासोबतच आत्मविश्वास, संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले.

दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक डॉ. सुशील सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवासाठी उत्कृष्ट तयारी केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच कला, संस्कृती, वक्तृत्व, सर्जनशीलता व बौद्धिक क्षमतांना चालना मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयाकडून विविध उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाते.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी समन्वयक म्हणून प्रा. सिद्धार्थ पवार यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कला व कौशल्यांना व्यापक व्यासपीठ मिळते तसेच नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी भविष्यातही अशा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील राहणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.