बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
जाखणगाव ता. खटाव येथील सचिन राजेंद्र जगदाळे याने केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यालय अधीक्षक (Income Tax) वर्ग-२ पदाच्या स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत पदाला गवसणी घातली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या सचिनच्या या यशामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सचिनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जाखणगाव, खटाव व पुसेगाव येथे मराठी माध्यमातून झाले. पुढे महाराजा सयाजीराव ज्युनिअर कॉलेज, सातारा येथे बारावी पूर्ण केल्यानंतर सावर्डे (जि. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याने पुणे गाठले. पुण्यात भाड्याच्या एका छोट्याशा खोलीत राहून दररोज सात ते आठ तास स्वयंअध्ययन करत त्याने आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा सुरू ठेवला.
चार वर्षे अपयशाने एक-दोन गुणांनी हुलकावणी दिली, मात्र सचिनने हार न मानता संयम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. या काळात बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेला मोठा भाऊ सौरभ याचे त्याला भक्कम पाठबळ लाभले.
घरची परिस्थिती बेताची… आई गृहिणी आणि वडील शेतकरी; पण स्वप्न मात्र मोठे! जिल्हा परिषद शाळेतील बर्गे गुरुजी यांनी दिलेल्या “मुलांना चांगले शिक्षण द्या” या सल्ल्याने आईने घेतलेला निर्णय या यशाचा पाया ठरला. आई लतिका यांच्या संस्कारांनी आणि वडिलांच्या कष्टांनी या दोन्ही भावंडांना प्रामाणिकपणा आणि मेहनतीची शिकवण दिली. कोरोना काळात कुटुंबाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र आईने जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मुलांना खचू दिले नाही. तिच्या मार्गदर्शनाने मुलांचा आत्मविश्वास सतत उंचावला गेला आणि आज त्या कष्टाचे गोड फळ मिळाले.
सचिनचा साधेपणा आजही तसाच कायम आहे. निकालाच्या दिवशीही तो शेतात ज्वारीच्या सुगीत गुंतलेला होता. कष्टाचे फोड हातावर असतानाही चेहऱ्यावर समाधान आणि मेहनतीची तयारी दिसत होती.आई-वडिलांचे संस्कार, भावाचे पाठबळ आणि स्वतःची अथक मेहनत यांच्या जोरावर साधलेले हे यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले आहे. सचिनसारखी तरुणाई केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर इतरांसाठीही आशेचा किरण बनते.
त्याच्या या यशाबद्दल आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, पंचायत समिती सदस्य हणमंत रोमन, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी सचिनने आपल्या यशाचे श्रेय आई लतिका यांच्या संस्कारांना, वडिलांच्या कष्टांना मोठा भाऊ सौरभ तसेच खटावचे शुभंकरोती क्लासचे संचालक राजेंद्र शिंदे, सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्त शिक्षक बर्गे गुरुजी यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनास दिले.





Social Plugin