Ticker

6/recent/ticker-posts

येरळा नदीला तात्काळ पाणी सोडण्याची मागणीआ.शशिकांत शिंदे यांची मागणी

फोटो ओळ : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना नेर तलावातील पाणी सोडण्याची मागणी करताना आमदार शशिकांत शिंदे व इतर मान्यवर.



बुध दि .[  प्रकाश राजेघाटगे ] 

टाव तालुक्याच्या उत्तर भागातील जीवनरेखा मानला जाणारा नेर तलाव सध्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे. या तलावावर डिस्कळ, ललगुण, बुधसह पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असून पुसेगाव, खटाव, निढळ, नेर, खातगुण, विसापूर, भांडेवाडी, कटगूण आणि जाखणगाव या गावांचे पिण्याचे व शेतीचे पाणी याच जलस्रोतावर अवलंबून आहे. पिण्याचा व शेतीच्या  पाण्याची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दोन ते तीन दिवसात पाणी सोडावे,अशी मागणी आ. शशिकांत शिंदे व पुसेगाव, खातगुणकरांनी केली आहे. 

मात्र, येरळा नदीचे पात्र अनेक दिवसांपासून कोरडे पडले असून भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती ओढवली असून पाण्याचे योग्य वितरण होत नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत.

विशेष म्हणजे, जिहे-कठापूर तसेच धोम धरणातून दुष्काळी भागासाठी पाण्याची तरतूद असतानाही गरजेच्या वेळी लाभक्षेत्रातील गावांना ते पाणी मिळत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सध्या नेर तलाव ७० टक्क्यांहून अधिक भरलेला असताना देखील स्थानिकांना पाणी मिळत नाही, ही बाब संतापजनक असल्याचे  निवेदनात म्हटले आहे.जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत नेर तलावात आवर्तन सुरू असताना येथील पाणी माण तालुक्यातील आंधळी तलावाकडे वळवले जात असल्याचा आरोप ही स्थानिकांनी निवेदनात केला आहे. “तलावातील पाण्यावर आमचा हक्क असताना आम्हालाच वंचित ठेवले जात आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वसंत कृष्णा जाधव, स्नेहल जाधव, गणेश जाधव, गौरव जाधव, संदीप जाधव, विजय लावंड, बाळासाहेब लावंड, श्रीकांत लावंड, प्रमोद भोसले, सुबोध जाधव आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः पाहणी करून पाणी सोडावे : शशिकांत शिंदे 

ऊसासह इतर पिके पाण्याअभावी करपू लागली असून येरळा नदीकाठावरील विहिरी आटण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिके जळत असताना प्रशासन निष्क्रिय असल्याची भावना तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तातडीने या भागाची पाहणी करून दोन दिवसांत नेर तलावातील पाणी येरळा नदी व कॅनॉलमध्ये सोडण्याची ठाम मागणी केली आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्वरित पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा.