Ticker

6/recent/ticker-posts

आरती भोसले 'स्टुडन्ट ऑफ द इयर' ने सन्मानित



नागनाथवाडीच्या आरतीचा शारदानगर महाविद्यालयात गौरव.

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (शारदानगर) येथील टी.वाय.बी.एस्सी (संगणक शास्त्र) विभागातील विद्यार्थिनी आणि नागनाथवाडी तालुका खटाव येथील सुकन्या कुमारी आरती माणिक भोसले हिला वर्ष २०२५-२६ साठीचा मानाचा 'स्टुडंट ऑफ द इयर' पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात  आले.

 वर्षभरातील आरतीची उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी, विविध शिष्यवृत्तींमधील यश, महाविद्यालयातील शिस्तप्रिय वर्तणूक आणि गुणवत्तापूर्ण कार्य या तिच्या अष्टपैलू कामगिरीची  दखल घेऊन महाविद्यालयाने तिला या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवडले. पदवीचे शिक्षण घेत असताना तिने यापूर्वीही अनेक गौरव प्राप्त केले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय संचलनासाठी (RD Parade) तिची निवड झाली होती, ज्यातून तिने आपल्या महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी यांच्या हस्ते आरतीचा हे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य निंबाळकर सर, सायन्स फॅकल्टी इन्चार्ज देशमुख सर, स्पोर्ट कॉर्डिनेटर देवकर सर आणि एन.एस.एस. विभाग प्रमुख सुनीता डांगे मॅडम, सर्व विद्यार्थीगण  आणि विविध मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती होती. मान्यवरांनी आरतीच्या जिद्दीचे आणि सातत्याचे तोंड भरून कौतुक केले.

आरतीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागनाथवाडी येथे झाले असून, प्राथमिक शाळेपासूनच ती विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी होत असे. तिचे आई-वडील अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतीची कामे करत असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे, संस्कारांकडे आणि जडणघडणीकडे बालवयापासूनच विशेष लक्ष दिले, त्याचाच हा परिपाक आज पाहायला मिळत आहे. आरतीचा एक भाऊ राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत आहे, तर दुसरा सिव्हिल इंजिनियर आहे.

आरतीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नागनाथवाडी जिल्हा परिषद शाळेतील आजी - माजी शिक्षकवृंद, शारदानगर महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग , तिचा मित्रपरिवार, नातलग आणि नागनाथवाडी गावचे ग्रामस्थ  या सर्वांच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.