बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील उत्तर भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने नेर तलावातील पाणी येरळा नदी पात्रात त्वरित सोडावे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पुर्वी आमदार महेश शिंदे व जि.प.अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे यांनी मतदारांना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दिलेलं आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा आमदार व जि.प.अध्यक्षा सौ प्रिया शिंदे यांना पुसेगाव पंचक्रोशीतील गावात फीरु देणार नाही, असा इशारा श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने दिला आहे.
श्री सेवागिरी रयत संघटनेचे कार्यकर्ते,आजी माजी सैनिक संघटना आणि पुसेगाव येथील शेतकरी यांच्या बैठकीत ते बोलत होते.बोलताना ते पुढे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या.या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे आणि आ.महेश शिंदे यांनी मतदारांना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वचन दिले होते.खटाव तालुक्यातील नव्वद टक्के क्षेत्र ओलिताखाली आणणारे पद मिळाल्यानंतर या भागातील पाणी प्रश्नावर चकार शब्द काढत नाहीत, हे दुर्दैव आहे.
निवडणूक प्रक्रिये पुर्वी पुसेगाव पंचायत समिती गणातील निढळ पंचक्रोशी व काही गावात जिहे कठापूर योजनेचं पाणी थोडे दिवस सोडलं आणि निवडणूक संपली की पाणी बंद केले.वास्तविक जेव्हा पाण्याची गरज नव्हती त्यावेळी पाणी देऊन, हे पाणी कायमस्वरूपी असल्याचे भासवून लोकांना फसवले आहे.
सध्या पाण्याची नितांत गरज असताना पुसेगाव पंचायत समिती गणातील सत्ताधारी आमदारांचा उमेदवार पराभूत झाल्याचं कारण पुढे करून पाण्याच्या प्रश्नावर आमदारांकडून राजकारण केले जात आहे.या त्यांच्या संकोचीत भूमिकेमुळे शेतकरी आणि सामान्य जनता भरडली जात आहे.
आमदार महेश शिंदे यांना पाणीदार आमदार,जलनायक उपाधी लावण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही.जनतेला आश्वासन देणे आणि ती न पाळणे, हा एवढाच एककलमी कार्यक्रम ते करत आहेत.येत्या आठवड्यात नेर तलावातील पाणी येरळा नदी पात्रात न सोडल्यास लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे , असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश जाधव यांनी केले आहे.
या बैठकीस श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त सचिन देशमुख, श्री सेवागिरी रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव,आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, बैलगाडी शर्यत संघटनेचे राहुल जाधव, माजी सरपंच बाळासाहेब जाधव,शेतकरी संघटनेचे विजय पवार,सत्यम जाधव,भरत जाधव,प्रतिक जाधव, श्रीकांत जाधव, संजय जाधव, विजय जाधव,पी.डी.जाधव, आदींसह पुसेगाव पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला राजकारणात ओढून त्याचे नुकसान करू नका.
जर येत्या चार दिवसांत प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर गुरुवारी संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून मोठं जलआंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि स्थानिक आमदारांची असेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.-श्री गौरव जाधव विश्वस्त श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगांव





Social Plugin