महाराष्ट्र ग्रामीण न्युज जामनेर/ गणेश जाधव
टाकळी खुर्द (ता. जामनेर) येथे दिनांक 13 एप्रिल 2026, सोमवार रोजी सायंकाळी 8 वाजता क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाच्या संचाने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच बाळूभाऊ चवरे यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी महापुरुषांच्या जयंतीतून समाजप्रबोधन होणे गरजेचे असल्याचे सांगत, डीजे व अनावश्यक खर्च टाळून व्याख्यानासारख्या उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी गावातील ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणून पूजा अशोक सोनवणे व उज्ज्वला चवरे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत पूजा सोनवणे यांनी बँकेत नोकरी मिळवली असून त्यांच्या यशात धनाई कोचिंग क्लासेसचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा सचिव रमेश दादा वराडे यांनी केले. त्यांनी महिलांनी सजग राहण्याचे आवाहन करत अंधश्रद्धा व कर्मकांडांपासून दूर राहून महात्मा फुले यांच्या विचारांचा स्वीकार करण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ह.भ.प. विनय महाराज (हिरापूर, चाळीसगाव) यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. त्यांनी महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात जे. बी. चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष, सत्यशोधक समाज संघ) यांनी टाकळी खुर्द गावात अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला महापुरुषांचे कार्य समजून घेण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष पवन भाऊ माळी यांच्यासह सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते कैलास महाजन सर, माजी सरपंच समाधान भाऊ वराडे, सारंगधर अहिरे, एम. डी. अहिरे, टाकळी बुद्रुकचे उपसरपंच कैलास भाऊ खाटीक, माळी महासंघाचे डॉ. वीरेंद्र अहिरे, राजू जगताप, गजानन अहिरे, निवृत्ती बाबा तायडे, डॉ. कृष्णा चवरे, भगवान माळी, कौतिक अहिरे तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिता वराडे, जिजाबाई अहिरे, माजी महिला सरपंच सरला अहिरे, ज्योती वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत अहिरे सर यांनी उत्कृष्टरीत्या केले व शेवटी उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शेकडो महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. टाकळी खुर्द येथे झालेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे गावात सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला.





Social Plugin