प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर :
श्री महाबली हनुमान जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे यंदा प्रथमच भव्य व पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली असून, ही मिरवणूक शहराच्या इतिहासात ऐतिहासिक ठरली. यापूर्वी नांदगाव खंडेश्वरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त कधीही शोभायात्रा काढण्यात आली नव्हती.गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता श्री हनुमान मंदिर, ओंकारखेडा येथून शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
या शोभायात्रेतील प्रमुख आकर्षणांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अयोध्या पॅटर्नवरील १६ फूट उंचीची श्रीरामांची भव्य दिव्य मूर्ती, तसेच श्री विष्णू भगवान यांचे तिसरे रूप असलेले २० फूट उंचीचे वराह अवतार हे विशेष आकर्षण ठरले. हा वराह अवतार देशात प्रथमच सादर करण्यात आला असून, दुसऱ्यांदा अमरावती येथे आणि तिसऱ्यांदा नांदगाव खंडेश्वर येथे सादर करण्यात आल्यामुळे या देखाव्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
याशिवाय ८ फूट उंचीची आसनस्थ श्रीराम मूर्ती, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती, गाय-वासरूची मूर्ती, १३ फूट उंचीची श्री हनुमान मूर्ती, बाल हनुमान व विविध धार्मिक देखावे नागरिकांचे आकर्षण ठरले.रथ, डमरू-टाळ व भस्म पथक, वारकरी दिंड्या यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. “जय श्री राम” व “जय हनुमान” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून पाणी व प्रसादाचे वाटप केले.
शोभायात्रेचा मार्ग श्री हनुमान मंदिर, ओंकारखेडा येथून सुरू होऊन विविध भागांतून मार्गक्रमण करत श्री हनुमान मंदिर, दांडगे लेआउट येथे महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शिस्त व सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन श्री महाबली हनुमान जयंती उत्सव समिती व जागृती दुर्गा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले होते.
अध्यक्ष किशोरभाऊ मो. शिरभाते व उपाध्यक्ष अक्षय प्रकाशराव पारसकर, योगेश चवाळे, योगेश खंडार, राहुल गेडाम, संजय पोफळे, वैभव कोंडवते, अविनाश ब्राम्हणवाडे, डॉ. भूषण पोतदार, अमोल धवसे, वासुदेव लोखंडे, मोहम्मद जावेद भाई, राजूभाऊ पाठक, अभिषेक पारसकर, कार्तिक सोनगडे, अनिकेत चवाळे, अमन काकडे, हेमंत सगळे, अंकित काळेकर, विशाल काळेकर, योगेश झिमटे, मंगेश देओळे, कैलास चांदणे, तेजस पाठक, ऋषिकेश मारोटकर, प्रसाद भगत, प्रथमेश पोफळे, शिवम ब्राम्हणवाडे, सागर लाड, ओम काळेकर, गणेश लांडगे, ओम देशमुख, पियुष रघुते, उमेश सोनोने, मोहन सोनोने, पृथ्वी परसनकर,चेतन सुने,गोपाल लाड , प्रसाद , शुभम बिजवे यांनी तसेच इतर सर्व नागरिक, आयोजक, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.





Social Plugin