नाशिक,प्रतिनिधी,जकीया शेख,
शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हर्षद पाटणकर आणि त्याच्या टोळीवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील गुन्हेगारांना धडकी भरली आहे.
टोळीचा म्होरक्या हर्षद सुनील पाटणकर हा गेल्या १० महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पसार होता. त्याच्यावर गोळीबार, प्राणघातक हल्ले आणि मालमत्तेचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्धरीतीने सापळा रचून काही दिवसांपूर्वीच पाटणकरला नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या होत्या. पाटणकर हा सराईत गुन्हेगारांची टोळी बनवून शहरात दहशत निर्माण करत होता.
आर्थिक फायद्यासाठी हिंसाचार करणे हा या टोळीचा मुख्य उद्देश होता. पोलिसांनी या टोळीचा कच्चाचिठ्ठा उपायुक्तांकडे सादर केला असता, आयुक्तांनी या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवला. या कारवाईत हर्षद पाटणकरसह महेश सोनवणे ऊर्फ चिमण्या, श्रवण पगारे, प्रदीप शेवाळे, मयूर वानखेडे, मयूर निकम व निखिल जाधव यांचा सगभाग आहे. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने सविस्तर अहवाल तयार केला. मोक्काच्या या दणक्यामुळे गुन्हेगारांना जरब बसणार आहे.




Social Plugin