Ticker

6/recent/ticker-posts

नजिक चिंचोली येथे नामचिंतन ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचा उत्साह; भाविकांची मोठी गर्दी



अहिल्यानगर ग्रामीण प्रतिनिधी - शरद धाडगे

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली (धाडगे वस्ती) येथे ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदासबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 'भव्य दिव्य पंचमदिनी नामचिंतन ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवा'ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.  या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला असून भाविकांची दर्शनासाठी आणि श्रवणासाठी मोठी गर्दी होत आहे.

नामसाधना आध्यात्मिक साधक आश्रमात सुरू असलेल्या या महोत्सवात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. पहाटे ४ वाजता होणारे नामचिंतन आणि त्यानंतर होणारी काकडा आरती यामुळे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्त मंत्रमुग्ध होत आहेत. सकाळी ७ ते ८ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन सुरू असून, दुपारी १ ते ४ या वेळेत अनुभवी वक्त्यांचे प्रवचन रंगत आहे.

नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी-

महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणारी कीर्तन सेवा. यामध्ये ह.भ.प. रामचंद्र म. इंगोले, ह.भ.प. ओंकार म. बाबर, ह.भ.प. डॉ. अजिंक्य महाराज चाकणकर आणि ह.भ.प. सौ. विजयाताई म. पंडित यांसारख्या दिग्गज कीर्तनकारांच्या प्रबोधनाचा लाभ भाविकांना मिळत आहे.

नियोजन आणि महाप्रसाद -

ह.भ.प. सद्गुरु महादेव महाराज धाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी दररोज सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नामसाधना आध्यात्मिक साधक आश्रम आणि चिंचोली ग्रामस्थ या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

मंगळवार, २८ एप्रिल रोजी होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.