Ticker

6/recent/ticker-posts

23 वर्षांनंतर पुन्हा जुळल्या शालेय आठवणींच्या रेशीमगाठी

 


बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]  

दहावीनंतर आयुष्याच्या वेगळ्या वाटांवर गेलेले शालेय मित्र-मैत्रिणी तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येताच जुन्या आठवणींना नवा उजाळा मिळाला. सर्वजण पुन्हा एकदा नव्याने भेटले. श्री. भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे सन

२००२-०३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. १९ मे रोजी आपुलकीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

              सदर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केल्यानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या बॅचचा दिवंगत विद्यार्थी कै.राजेंद्र गायकवाड याला सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सर्व उपस्थित शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.मुख्याध्यापक आर.एन.जाधव सर,लावंड सर, काटवटे सर, मोमीन सर,भोसले सर,एस.के.जाधव साहेब,घनवट सर , शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम या  स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मनोगतांतून शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.सर्वांच्या भेटीने काळ जणू थांबला .वही -पुस्तकांचे दिवस, वर्गातील खोड्या ,मैत्रीची घट्ट नाती हे सारे क्षण पुन्हा जिवंत झाले. शिक्षकांनी आपल्या मनोगतांतून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.  तद्नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

              आज कुणी शिक्षक, कुणी फौजी, कुणी व्यावसायिक कुणी शेतकरी ,कुणी गृहिणी असे असले तरी प्रत्येक जण आज पुन्हा शाळकरी मित्र झाला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या नावाचे सन्मानचिन्ह देऊन शाळेची एक आठवण दिली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या नामफलकाचे नूतनीकरण करून दिले.

           शाळेच्या बाकावर बसून पुन्हा एकदा हजेरी देण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. संगीत खुर्ची सारख्या मनोरंजक खेळांचा अनुभव घेतला. वर्षानुवर्षे हरवलेली नाती व्हाट्सअप च्या माध्यमातून पुन्हा जुळली आणि प्रत्यक्ष भेटून ही मैत्री अधिक घट्ट झाली.

          सकाळी ११ ते ५ हा वेळ कसा संपला हे कोणालाही कळले नाही.  कार्यक्रम आयोजनासाठी किशोर फडतरे, राजेंद्र शिंदे ,विठ्ठल जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा चव्हाण यांनी केले तर आभार नयन फडतरे यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्नेह मेळावा यशस्वीपणे पार पडला. 'पुन्हा भेटूया' या वचनाने स्नेहमेळावा संपन्न झाला.