Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्यूज | बोईसर मंडळाधिकारी कार्यालयातच किचन? शासकीय कार्यालयाचा वैयक्तिक वापर सुरू असल्याचा आरोप



१४ मे २०२६

पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील मंडळाधिकारी कार्यालयामध्ये थेट किचन तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या आत गॅस स्टोव्ह, स्वयंपाकाची भांडी, मसाले, पिण्याच्या बाटल्या, स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य तसेच जेवण बनवण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे हे सर्व एका सामान्य घराप्रमाणे वापरात असल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय कार्यालयात नागरिक आपली विविध कामे घेऊन येत असतात. मात्र अशा कार्यालयामध्ये स्वयंपाक सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. “हे कार्यालय आहे की सरकारी निवासस्थान?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

कार्यालयामध्ये गॅस सिलिंडर व स्वयंपाकाची साधने वापरली जात असल्याने सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या इमारतीमध्ये अशाप्रकारे किचन चालवल्याने आग लागण्याचा धोका संभवतो. जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी असते. परंतु काही ठिकाणी कार्यालयांचा वापर वैयक्तिक सोयीसाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयातील शासकीय जागेचा वैयक्तिक वापर करणे नियमात बसते का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कार्यालयाची पाहणी करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

यापूर्वीही काही शासकीय कार्यालयांमध्ये गैरव्यवहार व निष्काळजीपणाच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र आता थेट मंडळाधिकारी कार्यालयामध्येच किचन सुरू असल्याचे चित्र समोर आल्याने प्रशासनाची प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सदर प्रकाराबाबत संबंधित मंडळाधिकारी किंवा महसूल विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.