बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील घराघरांत पारंपरिक उन्हाळी खाद्य पदार्थांच्या तयारीला वेग आला आहे. शेतातील सुगीची कामे आटोपून नांगरट पूर्ण झाल्यानंतर बळीराजा शेणखत टाकण्याच्या कामात व्यस्त झाला असून, त्याची अर्धांगिनी वर्षभरासाठी लागणाऱ्या विविध खाद्य पदार्थांच्या तयारीत रमली आहे.
गावागावांत सध्या पापड, भातवड्या, कुरवंड्या, सांडगे, उपवासाच्या पापड्या, विविध चटण्या आदी पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे. हे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासत असल्याने महिला एकमेकींना सामूहिक सहकार्य करत पारंपरिक पद्धतीने हे पदार्थ तयार करत आहेत.
ग्रामीण संस्कृतीतील आपुलकी, सहकार्याची भावना आणि घरगुती पदार्थांची परंपरा या माध्यमातून जपली जात असल्याचे चित्र सध्या गावोगावी पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात अंगणात चटया अंथरून विविध पदार्थ वाळवले जात असून, महिलांचा उत्साह आणि कष्ट यातून ग्रामीण जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडत आहे.
छायाचित्र -
जांब (ता. खटाव ): येथील उन्हाळ्यात वर्षभरासाठी लागणारे पापड, भातवड्या, कुरवंड्या आदी पदार्थ तयार करून अंगणात वाळत घालताना महिला. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध





Social Plugin