Ticker

6/recent/ticker-posts

अनुदानाअभावी घरकुलांचे बांधकाम रखडले आवास योजनेचे अनुदान देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

 


आकाश रुमणे 

 नांदगाव खंडेश्वर (प्रतिनिधी) दि.19

 नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचे काम अनुदाना अभावी रखडले आहे. परिणामी, लाभाव्यर्थ्यांचे घरांचे स्वप्न भंगूर होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. लाभार्थ्यांना अनुदान देण्याची मागणी नगर पंचायतेचे गटनेते प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगर पंचायतने २०० लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाच्या परवानगी दिली असून १०० लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे. अनेक लाभाथ्यर्थ्यांचे घरकुलाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, पुढील बांधकाम अनुदान न मिळाल्यामुळे घरकुलाचे काम रखडले आहे. प्रथम हप्ता व द्वितीय हप्त्याचे अनुदान प्राप्त झाले नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. अनेक लाभार्थ्यांनी घर पाडून बांधकाम सुरु केल्याने भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.

आधिच तूटपुंज्या अनुदानात घरकुलांचे बांधकाम पूर्ण होत नाही. लाभार्थ्यांनी उसणवार पैसे तर जवळचे पैसे लावून घरकुलाचे बांधकाम केले. मात्र, घरावर स्लॅब, छपाई, दारं, खिडक्या इत्यादी करिता लाभार्थ्यांकडे पैसे नसल्याने घरकुल बांधकाम रखडले आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थी विवंचनेत असून पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान देण्यात यावे. अशी मागणी गटनेते प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.