प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर :
स्वीकृत नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांचे नगरपंचायतीला निवेदन
प्रधानमंत्री आवास योजना / घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन प्रलंबित निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक गरीब लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आपली जुनी घरे पाडून नवीन घरांच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र, योजनेअंतर्गत मिळणारे धनादेश / अनुदान अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून काहींना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. तर अनेकांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे.
यावेळी अविनाश ब्राम्हणवाडे यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, घरकुल योजनेचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईने जनता दरबार आयोजित करून लाभार्थ्यांना विविध आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्यांनंतरही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे गरीब नागरिकांनी स्वतःची जुनी घरे पाडून भाड्याच्या घरात राहत शासनाच्या निधीची प्रतीक्षा करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, प्रलंबित सर्व लाभार्थ्यांना तात्काळ निधी वितरित करावा, निधी वितरणातील विलंबाची चौकशी करावी तसेच घर पाडलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात त्वरित कार्यवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.





Social Plugin