Ticker

6/recent/ticker-posts

नेवासा तालुक्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा भीषण तडाखा; केळीच्या बागा उध्वस्त, वीज यंत्रणा कोलमडली!


महाराष्ट्र ग्रामीण न्यूज अहिल्यानगरप्रतिनिधी– शरद धाडगे

 नेवासा तालुक्यातील काही भागात आज, २३ मे रोजी दुपारी ४ वाजेनंतर अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह आणि अत्यंत वेगवान वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी वादळाचा सर्वाधिक फटका फळबागा आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बसला असून तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.

फळबागांचे अतोनात नुकसान; केळीच्या बागा उध्वस्त 

तालुक्यातील अनेक गावांमधे या वादळी वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, काढणीला आलेल्या आणि मोठ्या कष्टाने जोपासलेल्या केळीच्या बागांच्या बागा पार कोलमडून पडल्या आहेत. वादळामुळे केळीची झाडे मध्यभागातून मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. केळीसोबतच परिसरातील इतर फळबागा आणि भाजीपाल्यालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

झाडे उन्मळून पडली; वीज खांब कोसळल्याने पुरवठा खंडित

वादळाची तीव्रता एवढी मोठी होती की, अनेक गावांमधे रस्त्यांच्या कडेला असलेली मोठी झाडे आणि फांद्या उन्मळून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्वात मोठे नुकसान महावितरणच्या यंत्रणेचे झाले असून, अनेक भागात विजेचे खांब (पोल) आणि तारा तुटून पडल्या आहेत. परिणामी, दुपारपासूनच ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. वीज कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असले, तरी पुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.