*राजश्री शाहू महाराज विद्यालय (गुजरी) शाळा स्थलांतर प्रकरण तापले.*
*ग्रामीण प्रतिनिधी गुजरी | स्वप्नील घोटेकार*
राळेगाव तालुक्यातील मौजा गुजरी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतर प्रकरणाने आता गंभीर आणि स्फोटक वळण घेतले असून, ग्रामपंचायत प्रशासनातील कथित मनमानी कारभारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. गुजरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक म्हणून संबंधित ग्रामसेविका पाहत आहेत. मात्र या प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर करून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पालकांना अंधारात ठेवत शाळा स्थलांतरासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संतापजनक प्रकाराविरोधात मावळते ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकत्र येत गटविकास अधिकारी केशव पवार यांना जोरदार निवेदन सादर केले. विशेष म्हणजे या निवेदनावर मावळत्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्याही असून, ग्रामपंचायत बॉडीचा कोणताही अधिकृत ठराव नसताना परस्पर एनओसी देण्यात आल्याने गावात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुजरी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालय हे परिसरातील गरीब, शेतकरी, कष्टकरी व मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र ही शाळा तब्बल ६५ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार शाळेचे स्थलांतर १० किलोमीटरच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित प्रकरणात शासन नियमांना हरताळ फासत तब्बल ६५ किलोमीटर दूर स्थलांतराचा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याने “हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीच्या अभिलेखामध्ये या विषयाचा कोणताही ठराव अस्तित्वात नाही. ग्रामसभा घेण्यात आली नाही, सदस्यांची मंजुरी घेण्यात आली नाही, पालक व ग्रामस्थांची भूमिका विचारात घेण्यात आली नाही. तरीदेखील ग्रामसेविकेने प्रशासकीय अधिकारांचा वापर करून एनओसी दिलीच कशी? हा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला? यामागे नेमके कोणते हितसंबंध आहेत? याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “गावाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घालू नये; संबंधित ग्रामसेविकेवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत
ग्रामसेविकेने दिलेल्या एनओसीची तात्काळ चौकशी करण्यात यावी, ग्रामपंचायत ठरावाशिवाय एनओसी देणाऱ्या संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी ग्रामसेविकेला निलंबित करण्यात यावे, शाळा स्थलांतर प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्यात यावी, शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी राजश्री शाहू महाराज विद्यालय गुजरी येथेच कायम ठेवण्यात यावे.
दरम्यान, या निवेदनामुळे पंचायत समिती राळेगाव, शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





Social Plugin