सेवागिरी रयत संघटना व गौरव जाधव मित्र समूहाचा उपक्रम
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी रयत संघटना व गौरवभैय्या जाधव मित्र समूह पुसेगाव व पंचक्रोशीतील एक हजार १११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना यंदाही सलग पाचव्या वर्षी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार असून ५१ अनाथ मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी दत्तक घेणार आहे. तरी आपल्या पाल्याला कोणत्याही शैक्षणिक मदतीची गरज असल्यास पालकांनी आठ जूनपर्यंत ९७६६५६८२६८, ९१७५१२८२५३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गौरवभैय्या जाधव मित्र समूहाने केले आहे.
विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळतात, परंतु त्या व्यतिरिक्त लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा. स्कूल बॅग, वही, पेन, पेन्सिल, कंपास, आदी साहित्य काही विद्यार्थ्यांना त्यांचे पालक देऊ शकत नाहीत. महागाई वाढल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील अनेक पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदी करताना अडचणी येतात.
समाजसेवेच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून चार हजारांहून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ विद्यार्थ्यांना ‘शाळासोबती’ या उपक्रमाअंतर्गत श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव व पंचायत समिती सदस्या सौ स्नेहलताई जाधव यांनी स्वखर्चातून मोफत उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे गरजवंताला मदत करताना दिलेल्या वस्तूंवर आपला पक्ष अथवा स्वतःचे नाव न छापता ते मदत करत आहेत.
यंदा देखील या उपक्रमाअंतर्गत पुसेगावमधील पालकांनी एक कॉल आणि नोंदणी फॉर्म भरून आपल्या पाल्याची आवश्यक असणारी माहिती दिल्यानंतर नोंदणीनुसार उपक्रमात सहभागी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना श्री सेवागिरी रयत संघटना व गौरवभैय्या जाधव मित्र समूह शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहे.
कोट :
शैक्षणिक मदतीच्या माध्यमातून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षणासंबंधी कोणत्याही मदतीची गरज भासल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
-गौरव जाधव - विश्वस्त, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट





Social Plugin