Ticker

6/recent/ticker-posts

वेढीच्या कन्येची भरारी; ऐश्वर्या वैतीची मुंबई पोलीस दलात निवड, गावासह समाजात अभिमानाचे वातावरण



३० मे २०२६

पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

वेढी, ता. पालघर : जिद्द, चिकाटी, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे जिवंत उदाहरण वेढी गावातील कु. ऐश्वर्या भालचंद्र वैती हिने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सर्वसामान्य शेतकरी (कोळी) कुटुंबातील या युवतीची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने वेढी गाव, वैती आगरी समाज आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजच्या आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षण, प्रशासन, विज्ञान, उद्योग, संरक्षण, क्रीडा आणि पोलीस दल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशाच यशस्वी महिलांच्या यादीत आता वेढी गावातील ऐश्वर्या वैती हिचे नाव अभिमानाने घेतले जात आहे.

ऐश्वर्याचा जीवनप्रवास हा संघर्षमय राहिला आहे. लहान वयातच आईचे छत्र हरपल्यानंतर तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. मात्र परिस्थितीपुढे हार न मानता तिने शिक्षण पूर्ण केले. घरातील कामे, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःच्या भवितव्याची चिंता यामध्ये समतोल साधत तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. अनेक मुली सुरक्षित आणि तुलनेने सोपी करिअरची वाट निवडतात; मात्र ऐश्वर्याने देशसेवेचा खडतर मार्ग निवडला.

“मला पोलीस अधिकारी बनायचे आहे आणि समाजासाठी काम करायचे आहे,” हा निर्धार तिने मनाशी बांधला. त्यासाठी पालघर येथील जिजाऊ पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेत तिने कठोर परिश्रमाला सुरुवात केली. दररोजचे शारीरिक प्रशिक्षण, अभ्यास, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मानसिक ताण यांचा सामना करत तिने आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवले.

मुंबई पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा, मैदानी चाचणी आणि वैद्यकीय तपासणी या सर्व टप्प्यांमध्ये ऐश्वर्याने यश मिळवले. कठोर स्पर्धेच्या या प्रक्रियेत यशस्वी होत तिने मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले. यामुळे तिने आपल्या वडिलांना दिलेला “बाबा, मी पोलिस होणारच” हा शब्द प्रत्यक्षात उतरवला.

ऐश्वर्याच्या या यशामागे तिचे वडील भालचंद्र वैती यांचे मोठे योगदान असल्याचे गावकरी सांगतात. मुलीची जिद्द आणि धडपड पाहून त्यांनी तिच्या शिक्षणाला व करिअरला नेहमीच पाठबळ दिले. समाजात मुलींच्या लग्नाचा विचार प्रथम केला जातो; मात्र भालचंद्र वैती यांनी मुलीच्या स्वप्नांना प्राधान्य देत तिच्या प्रत्येक पावलावर साथ दिली. त्यामुळेच ऐश्वर्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे बळ मिळाले.

विशेष म्हणजे प्रशिक्षण केंद्रात अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असूनही ऐश्वर्या अनेकदा घरी परतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करून कुटुंबीयांच्या सहवासात अभ्यास करणे तिला अधिक प्रेरणादायी वाटत असल्याचे तिने सत्कार समारंभात सांगितले. आपल्या यशाबद्दल बोलताना ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

या उल्लेखनीय यशानिमित्त आगरी सोनकोळी समाज मंडळातील युवकांनी अल्पावधीत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी वेढी ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, माजी उपसरपंच सौ. नेहा वैभव वैती, समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

माजी उपसरपंच सौ. नेहा वैभव वैती यांच्या हस्ते ऐश्वर्याचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ समाजसेवक मोरेश्वर वैती यांच्या हस्ते ऐश्वर्याचे वडील भालचंद्र वैती यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ऐश्वर्याच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गावकऱ्यांच्या मते, वेढी गावातून मुंबई पोलीस दलात निवड होणारी ऐश्वर्या ही आजपर्यंतची पहिली युवती आहे. त्यामुळे तिच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिच्या निवडीमुळे गावातील अनेक मुली आणि युवकांना प्रेरणा मिळणार असून शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे.

ऐश्वर्याच्या यशामुळे केवळ तिचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण वेढी गाव अभिमानाने उंचावले आहे. तिच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते.

“भालचंद्र भाऊंची जान, समाजाची शान आणि गावाचा अभिमान” ठरलेल्या कु. ऐश्वर्या भालचंद्र वैती हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

— प्रतिनिधी, पालघर