बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
फडतरवाडी (बुध)ता. खटाव ग्रामपंचायतीमध्ये 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत मूल्यमापन समितीची तपासणी अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. गावातील अभूतपूर्व एकता, रांगोळ्यांची आरास, रंगरंगोटी आणि चक्क बळीराजाच्या रथातून करण्यात आलेल्या समितीच्या स्वागताने प्रशासकीय अधिकारीही भारावून गेले.मूल्यमापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर धनगे (तालुका आरोग्य अधिकारी, मालवण), सचिव श्री. लक्ष्मण हांडे (विस्ताराधिकारी, मालवण), आणि श्री. गितेश कोंदे (घरकुल विभाग, मालवण) यांच्यासह पंचायत समिती वडूजच्या कर्मचाऱ्यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फुलांनी सजवलेला बळीराजाचा रथ आणि ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांमुळे संपूर्ण गावाला उत्सवाचे स्वरूप आले होते.समितीने गावातील विविध विभागांची आणि पायाभूत सुविधांची बारकाईने पाहणी केली. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि तेथील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम.स्मशानभूमीतील सुविधा, घरकुल योजना आणि स्वच्छतेचे निकष.महिला बचत गट, शेतकरी गट आणि सहकारी सोसायटीचे कामकाज.
ग्रामस्थांची लोकवर्गणी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) झालेली शाळेची रंगरंगोटी, ओपन जिम आणि बंदिस्त व्यायामशाळा.जांभळाचे गाव' म्हणून नवी ओळख या दौऱ्यातील मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे गावाची वृक्षलागवड मोहीम. गावाच्या एकूण लोकसंख्येइतकी झाडे लावून त्यांचे संगोपन केले जात आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक झाडाला गावातील महिलांच्या नावाचे टॅग लावण्यात आले असून, त्यांच्यावरच संगोपनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जांभळाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून, भविष्यात 'जांभळाचे गाव'म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे.
ही तपासणी यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रियांका फडतरे, उपसरपंच सयाजी फाळके ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी संतोष माळवे ., शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, ग्रामस्थ ,तरुण मंडळ आणि विशेषतः महिला वर्गाने अहोरात्र परिश्रम घेतले. शंभर गुणांच्या निकषांवर उतरण्यासाठी गावाने दाखवलेली ही सज्जता इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत ठरणारी आहे.
कोट-
गावातील प्रत्येक नागरिकाने या अभियानाला आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम केले आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय पारदर्शकता यामुळेच फडतरवाडी (बुध) आज समृद्धीच्या वाटेवर आहे."
सौ . प्रियांका विकास फडतरे ( सरपंच, फडतरवाडी ) छायाचित्र _ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना पाहणी करताना अधिकारी व समस्त ग्रामस्थ छाया - प्रकाश राजेघाटगे बुध
-





Social Plugin