पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील नव्याने सुरू झालेल्या रस्त्यालगत असलेल्या सिडको बायपास रस्त्यालगत सिडकोच्या जागेवर लोखंडी पोल उभारून जागा कब्जा करून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित जागेमध्ये झाडे लावून ती खासगी मालमत्तेसारखी वापरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा ही सिडकोच्या मालकीची असताना काही व्यक्तींनी लोखंडी पोल उभारून परिसर बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्या जागेमध्ये झाडे लावून भविष्यात मालकी हक्क असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नव्याने सुरू झालेल्या रस्त्यामुळे या परिसराचे महत्त्व वाढत असल्याने आधीच जागा राखून ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या मते, शासकीय अथवा सिडकोच्या जागेवर अशा प्रकारे कब्जा करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज फक्त लोखंडी पोल व झाडे लावून जागा राखून ठेवली जात असली तरी भविष्यात त्याच ठिकाणी कायमस्वरूपी अनधिकृत बांधकाम उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीलाच कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, रस्त्यालगत उभारण्यात आलेले लोखंडी पोल व स्ट्रक्चर भविष्यात धोकादायक ठरू शकतात. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहनचालकांना या लोखंडी पोलचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे कब्जा वाढत गेल्यास भविष्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनू शकतो.

स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की संबंधित प्रशासनाला या प्रकाराची माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासन वेळेत कारवाई करत नसल्याने शासकीय जागांवर कब्जा करण्याचे प्रकार वाढू शकतात व इतरांनाही अशा अतिक्रमणाला प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिकांनी प्रशासन, तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पाहणी करून संबंधित जागेची चौकशी करावी, सुरू असलेले अतिक्रमण हटवावे व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे।