बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
विधान परिषद निवडणूक ही साधारणतः प्रस्थापित नेत्यांची निवडणूक असा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही. कारण या निवडणुकीत मतदार संख्या कमी असल्याने लक्ष्मी दर्शन व राजकीय घोडेबाजार हे ठरलेले गणित असते. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षातील प्रस्थापित व श्रीमंत उमेदवारांना उमेदवारी देण्याचा जणू प्रघात पडला आहे. सण 2016 च्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार श्री मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीच्या श्री शेखर गोरे यांचा पराभव केला त्यावेळी राष्ट्रवादीकडे अधिकचे संख्याबळ असून सुद्धा राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्या निवडणुकीत राजकीय घोडेबाजार झाला अशी चर्चा त्यावेळी समाज माध्यमात होती. आणि आता होऊ घातलेल्या निवडणुकीत सुद्धा राजकीय चमत्कार होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्याची आकडेवारी पाहता सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत 895 अशी मतदार संख्या असून यामध्ये सातारा 472 व सांगली 423 अशी संख्या असून भाजपा 345, राष्ट्रवादी अजित पवार गट 211,राष्ट्रवादी शरद पवार 119,शिंदे सेना 111, काँग्रेस 75 अपक्ष 35 व इतर असे संख्याबळ आहे. या संख्याबळानुसार महायुती चे उमेदवार श्री धैर्यशील कदम व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अभयसिंग जगताप या दोघांनाही त्यांच्या मित्र पक्षांची मदत गरजेची आहे परंतु या निवडणुकीचा इतिहास पाहता ही निवडणूक पक्षीय पातळी पेक्षा राजकीय हितसंबंध व एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी लढवली जाते त्यामुळे संख्याबळानुसार महायुती चे उमेदवार श्री धैर्यशील कदम यांचे पारडे जड असले तरी धक्कादायक निकाल लागू शकतो अशी चर्चा राजकीय माध्यमातून चालू आहे.
*सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय आखाडा भोवणार?*
काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत शिंदे शिवसेना व राष्ट्रवादीची बहुमत असताना सुद्धा भाजपाने राजकीय पदाचा वापर करून सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचा उमेदवार निवडून आणला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई व मदत पुनर्वसन मंत्री श्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजपा व त्यांचे दोन्ही मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे हे जरी कोणी जाहीरपणे बोलत नसेल तर अंतर्गत धुसफूस निश्चित दिसून येत आहे. एकेक आहे मतदारसंघात भूकंप झाला त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पाटणच्या पंचायत समिती कार्यालयात घेणारे माजी गृहमंत्री श्री बाळासाहेब देसाई यांचे नातू विद्यमान पालकमंत्री श्री शंभुराजे देसाई राजकीय कणखरपणात दाखवतात का हे या निवडणुकीत स्पष्ट होईल कारण पदावर बसलेला लोकप्रतिनिधींना मारहाण होणे किंवा धक्काबुक्की होणे हे निषेधार्थ आहे आणि हे जर श्री बाळासाहेब देसाई यांच्या नातवांच्या बरोबर घडत असेल तर ही बाब सातारा जिल्ह्यासाठी निश्चितच भूषण नाही त्यामुळे श्री शंभूराजे देसाई यावेळेस भाजपाला कात्रज घाट दाखवतील असे दिसून येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील श्री जयकुमार गोरे यांचा वावर वाढल्याने सातारचे दोन्ही महाराज नाराज आहेत अशी चर्चा आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सांगली जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आग्रही होते त्यामुळे श्री धैर्यशील कदम यांच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका श्री अभयसिंग जगताप यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण श्री जयंत पाटील व काँग्रेस सहयोगी खासदार श्री विशाल पाटील यांचे गणित कसे जुळणारे आहे यावर श्री जगताप यांचे गणित अवलंबून आहे.
या निवडणुकीत कोणती आघाडी किंवा युती विजयी होते यावर पुढील राजकारण दिशा मिळणार आहे परंतु या निवडणुकीत मतदारांची आर्थिक चंगळ होणार हे निश्चित आहे असेच म्हणावे लागेल.






Social Plugin