Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील नव्या शिक्षक संच मान्यतेमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन सुमारे ५ हजार शिक्षक शासन घरी घालवणार?



शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण या अनिवार्य विषयाच्या शिक्षकांचा कार्यभार शून्य?

बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे  ] 

 अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेचा नवीन  मसुदा १७ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यातील नियमानुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रात्यक्षिक वर्गातील विद्यार्थी संख्या २० वरून ३० करण्यात आली आहे. त्याचवेळी ४५ मिनिटांचा तास ४० मिनिटे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल ५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. तर शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण या अनिवार्य विषयाच्या शिक्षकांचा कार्यभार शून्य करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. याबाबत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना आक्रमक झाली असून सदर संच मान्यता कोणत्याही महाविद्यालयाला मान्य नसल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विलास खंडाईत व सचिव गोविंद वाघ यांनी दिली. याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.

           सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची दि २ आणि ४ जून ला शिक्षक संच मान्यता मेन राजाराम कॉलेज, भवानी मंडप कोल्हापूर येथे होणार असल्याचे शासन परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले. मात्र सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी साडे तीन वाजेपर्यंत शासनाची संबंधित वेबसाईट चालू झाली नसल्याने सर्वांना मनस्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यातील सुमारे ७२ महाविद्यालयाचे प्राचार्य, लिपिक, शिक्षक सकाळ पासून हजर असूनही रात्री आठ वाजेपर्यंत  कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे मोजक्याच कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता रात्री उशीरा झाली, इतर महाविद्यालये या कार्यालयाने अद्याप ही पेंडिंगला ठेवली .वेबसाईट बंद असल्याचे कारण सांगून या कार्यालयातील कोणीही अधिकारी कर्मचारी तब्बल चार तास फिरकला नाही.त्यानंतरही आणखी दोन तास शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला. अखेर तुमची मान्यता 'पेंडिंग ' असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली.

       शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक नंतर कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यता निकष बदलले आहेत. शिक्षण संचालक कार्यालयाने कनिष्ठ महाविद्यालयातील २०२ एस५-२६ शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेचा नवीन मसुदा ऑनलाइन पद्धतीने २७ मे रोजी लागू केला आहे. त्यातसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ वर्षांपूर्वी तासिकेचा कालावधी ४५ मिनिटांचा आहे तो तसाच ठेवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आता हा नव्या नियमांमध्ये ४० मिनिटांचा करण्यात का आला ? यामुळे शिक्षक संख्या कमी होणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणानुसार तास ५० ते ६० मिनिटांचा असला पाहिजे ,मात्र तो कार्यभार कमी करण्यात आला आहे. त्याच वेळी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयासाठी २० विद्यार्थ्याऐवजी ३० विद्यार्थ्यांची  एक प्रात्यक्षिक वर्ग (प्रॅक्टिकल बॅच ) केल्याने प्रत्येक तुकडीमागे ६ ते ८ तासिकेचा शिक्षकांचा कार्यभार कमी होणार आहे.यामुळे विज्ञान विषयाचे २५ ते ४० टक्के शिक्षक अतिरिक्त होणार आहे.

     दरम्यान दोन चार दिवसांपूर्वी झालेल्या संच मान्यतेच्या कॅम्प मध्ये दिलेल्या ड्राफ्ट नुसार शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण या अनिवार्य असलेल्या विषयाच्या शिक्षकांचा कार्यभार शून्य करण्यात आला आहे. यामुळे शारीरिक शिक्षक नसल्याने विद्यार्थी खेळात निपुण होऊन प्राविण्य मिळाऊच शकत नाही तसेच,  पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्याला काहीही माहिती होणार नाही त्यामुळे शासनाने २०२४- २५ प्रमाणे संच मान्यता करावी, कोणत्याही विषयाचा शिक्षक  अतिरिक्त होणार नाही आणि महाविद्यालयातील एखादा विषय बंद होणार नाही याची काळजी शासनाच्या शिक्षण विभागाने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.


इ १२ वी परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्याचे शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण शास्त्र अनिवार्य विषय असतानाही यांच्या श्रेणी दिल्या नाहीत तर संबंधित शिक्षकांना बोलाऊन विभागीय मंडळाच्या वतीने झाडाझडती केली जाते, अशा शिक्षकांचा कार्यभार संच मान्यतेच्या ड्राफ्ट मध्ये शून्य का केला? शासनाला अशा शिक्षकांची शाळा, महाविद्यालयात गरज वाटत नाही का? वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावर ही जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे त्यामुळे शास्त्र शाखेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तातडीने शासनाने संच मान्यतेच्या बाबत घेतलेला सध्याचा निर्णय बदलावा, अन्यथा राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.--श्री आर एन पवार शारीरिक शिक्षण शिक्षक