रांजणगाव एमआयडीसी येथील डंकन इंजिनिअरिंग लिमिटेडमध्ये कार्यरत असलेले सचिन जाधव यांना "HR Excellence Award 2026" अंतर्गत "Best HR Manager 2026" या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अदानी उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अमिताभ मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भारतीय पोलीस सेवेतील "Ironman" म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे ही देखील त्यांच्यासाठी प्रेरणादायी बाब ठरली.
मानव संसाधन व्यवस्थापनाबरोबरच सचिन जाधव यांनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांमध्येही उल्लेखनीय योगदान दिले आहे. शिरूर व परिसरातील विविध सामाजिक संस्थांना मदत करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिरूर येथील आश्रमशाळेला किराणा साहित्य वाटप, टाकळी हाजी परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेस मदत, कोंढापुरी येथील मागासवर्गीय निवासी शाळेला विविध शैक्षणिक साहित्य पुरवठा, कारेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वितरण, तसेच शिरूर येथील व्हिजन हॉस्पिटलच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन अशा अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी केलेले आहेत.
याशिवाय शिरूर ग्रामीण भागातील विविध CSR प्रकल्प सध्या प्रक्रियेत असून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे सदस्य म्हणून सचिन जाधव यांनी उद्योग, पोलीस प्रशासन, एमआयडीसी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक घटक यांच्यात समन्वय निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
तसेच कामगार संघटनांशी संबंधित विविध प्रश्न आणि औद्योगिक वाद सोडविण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका बजावत औद्योगिक शांतता व सौहार्द टिकवून ठेवण्यास मोलाचे योगदान दिले आहे.
या पुरस्कारामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक यश अधोरेखित झाले नसून शिरूर परिसरातील सामाजिक व औद्योगिक विकासासाठी केलेल्या कार्यालाही गौरव प्राप्त झाला आहे.





Social Plugin