राजकीय दबावाची चर्चा; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह
पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर
मौजे सरावली, ता. पालघर येथील अवधनगर परिसरातील सर्वे क्रमांक 94, प्लॉट क्रमांक 7, क्षेत्र 0.81.00 हेक्टर आर या शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महसूल प्रशासनाने 23 जून 2026 रोजी कारवाई निश्चित केली होती. यासंदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, नियोजित दिवशी प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 50 व 53 अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले होते. संबंधितांना अतिक्रमण स्वतःहून हटविण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण कायम असून नियोजित दिवशी महसूल विभागाची कारवाई झालेली नाही.
दरम्यान, कारवाईच्या ऐनवेळी काही राजकीय स्तरावर हालचाली झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, राजकीय दबावामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत महसूल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाची जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने स्वतः नोटीस बजावून कारवाईची तारीख निश्चित केली होती. त्यामुळे नियोजित दिवशी कारवाई न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर कोणत्याही दबावामुळे कारवाई थांबविण्यात आली असेल, तर ते शासनाच्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणात कारवाई का झाली नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा. तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा इतर दबावाला बळी न पडता शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.
23 जून रोजी निश्चित केलेली कारवाई का झाली नाही? कारवाईमागे नेमके कोणते कारण होते? प्रशासन पुढील तारीख जाहीर करणार का? या प्रश्नांची उत्तरे आता महसूल प्रशासनाने देणे अपेक्षित असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
.jpg)




Social Plugin