धुळे तालुक्यातील अंचाडे येथील एका शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे तहसील कार्यालयाचा पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनिष बागुल याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्याची ज्वारी मोजताना ती चांगल्या दर्जाची दाखवण्यासाठी आणि त्याचे ऑनलाईन बिल विनाअडथळा मंजूर करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचखोर अधिकाऱ्यावरील या धडक कारवाईमुळे महसूल आणि पुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, अंचाडे येथील तक्रारदार शेतकरी आणि त्यांच्या पत्नीने रब्बी हंगामातील आपली ज्वारी विक्रीसाठी धुळे येथील शासकीय गोदामात आणली होती. मालाची मोजणी सुरू असताना संशयित आरोपी मनिष बागुल याने शेतकऱ्याला बाजूला घेऊन ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून ऑनलाईन बिल काढण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने तात्काळ धुळे एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीची कायदेशीर पडताळणी केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने शासकीय गोदाम परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. यावेळी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना संशयित आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.





Social Plugin