Ticker

6/recent/ticker-posts

मराठी भाषेच्या सन्मानासाठी अमळनेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन; राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी




प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर )

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत ज्येष्ठ गायिका स्व. आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावावेळी मराठीऐवजी इंग्रजी भाषेचा वापर केल्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेचे निषेध प्रदर्शन केले तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आंदोलनानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विधानसभेच्या अध्यक्षांसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने मराठी भाषेचा सन्मान राखणे अपेक्षित असताना इंग्रजी भाषेचा वापर करून मराठी जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. अशा प्रकारची घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या ओळखीचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी मराठी भाषेला प्राधान्य देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोज पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अॅड. रज्जाक शेख, युवक काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी, विविध सेलचे प्रतिनिधी तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून मराठी भाषेच्या सन्मानासाठी काँग्रेसचा लढा यापुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.