बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
पुसेगाव-वडूज मुख्य रस्त्यावरील खटाव ते भुरकवडी दरम्यान असलेल्या जाधव वस्ती शेजारी आज दुपारी क्रूझर आणि हुंडाई ओरा कार यांच्यात अत्यंत भीषण समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे चालक गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातातील दोन्ही चालक हे खटाव गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्पाक रज्जाक शेख (रा. खटाव) हे आपल्या फोर्स क्रूझर गाडीतून (क्र. MH 11 CQ 1252) पुसेगाव बाजूकडून वडूजकडे जात होते. याच दरम्यान, अजय नवनाथ जाधव (रा. खटाव) हे आपल्या हुंडाई ओरा कारमधून (क्र. MH 11 DV 0091) वडूज बाजूकडून पुसेगावच्या दिशेने येत होते. खटाव ते भुरकवडी रस्त्यावरील जाधव वस्तीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, फोर्स क्रूझर गाडी रस्त्यावरच एका कडेला पलटी झाली, तर हुंडाई ओरा कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर होऊन ती रस्त्याशेजारील झाडाला जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका (Ambulance) आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, पोलिसांनी क्रेन व इतर साधनांच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे पुसेगाव-वडूज रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.





Social Plugin