टेंभुर्णी (जालना) प्रतिनिधी विष्णु मगर
जाफ्राबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या फार मोठ्या अवैध जुगार अड्ड्यावर टेंभुर्णी पोलिसांनी धडक छापा टाकला आहे. गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी दि. 18/6/2026 रोजी गावाबाहेरच्या निर्जन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून 10 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र कारवाई होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अंमलदार राजू डोईफोडे यांना देळेगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच अनेक जुगारखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. धावपळीत केवळ 3 जण पोलिसांच्या हाती सापडले. घटनास्थळावरून जुगारासाठी वापरल्या जाणाऱ्या 10 मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा जुगार अड्डा फार मोठा होता. शेकडोच्या संख्येने लोक इथे जुगार खेळायला येत होते. एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही FIR न झाल्याने "वरून दबाव आहे का?" किंवा "मिटवाफेरीचा प्रयत्न होतोय का?" अशा चर्चांना उधाण आलं आहे.
याबत टेंभुर्णी पोलिसांशी संपर्क साधला असता, "तपास सुरू आहे, योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा नोंदवला जाईल" अशी प्रतिक्रिया मिळाली.
ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन या जुगार अड्ड्यामागील सूत्रधारांवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा तरुणाई अशाच प्रकारे भरकटत राहील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे





Social Plugin