श्री वर्धिनी विद्यालयात विद्यार्थ्यांचे मोफत शालेय साहित्याने स्वागत; गावाकडून कौतुकाचा वर्षाव
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्थेच्या 'श्री वर्धिनी विद्यालय, वर्धनगड' मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एका अनोख्या आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाने झाली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे, गावच्या हितासाठी सातत्याने धडपडणारे जात-पात अमीर गरीब या सर्व गोष्टींना फाटा देऊन आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मुंबईतील प्रतिष्ठित रंग कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय घोरपडे साहेब यांच्या दातृत्वातून आणि विद्यालयाच्या शिक्षक वृंदांच्या सहकार्यातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
संजय घोरपडे यांच्याकडून २४ कॅरेटचे सामाजिक योगदानआपली नाळ गावाशी घट्ट ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय घोरपडे साहेब यांनी खास मुंबईवरून १५,००० रुपये किमतीची दर्जेदार शालेय दप्तरे, वह्या आणि पुस्तके आणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मोठे पाऊल उचलले. एवढेच नव्हे तर, विद्यालयाच्या सोयीसाठी त्यांनी वैयक्तिक खर्चातून १०,००० रुपये किमतीच्या खुर्च्याही विद्यालयास भेट दिल्या. त्यांच्या या दातृत्वामुळे शाळेच्या एकूणच वातावरणात अमुलाग्र आणि सकारात्मक बदल दिसून येत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. भरत फडतरे सर यांनी प्रमुख अतिथी श्री. संजय घोरपडे साहेब, गावचे पोलीस पाटील श्री. जठार साहेब व इतर मान्यवर ग्रामस्थांचे विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत केले. प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापकांनी घोरपडे साहेबांच्या योगदानाचा गौरव केला. "हा उपक्रम गोरगरीब आणि परगावावरून पायपीट करत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार असून, यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला बळ मिळेल," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
केवळ शिकवणे हेच कर्तव्य न मानता, येथील शिक्षकांनीही सामाजिक बांधिलकी जपली आहे. मुख्याध्यापक भरत फडतरे सर, श्री. कदम सर, श्री. शिंदे सर, श्री. माने सर, सौ. मुलाणी मॅडम आणि सोनटक्के मामा या सर्वांनी एकत्र येत स्वतःहून १५,००० रुपयांचा निधी जमा केला व त्यातून वह्या, पुस्तके आणि दप्तरे वाटप केली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी हातात नवीन दप्तर, वह्या आणि पुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. याप्रसंगी बोलताना श्री. संजय घोरपडे साहेब म्हणाले, "ग्रामीण भागात अशी शैक्षणिक आणि सामाजिक परंपरा निर्माण झाल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची समान संधी मिळेल, पर्यायाने विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ होईल."
तसेच, शाळेच्या पहिल्या दिवशी श्री. अर्जुन मोहिते (आप्पा) आणि वडूज आगाराच्या सौ. रूपाली कदम मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत केले होतेग्रामस्थांनी श्री. संजय घोरपडे साहेब आणि विद्यालयाच्या सर्व शिक्षक स्टाफचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल तोंडभरून कौतुक केले व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शिंदे सर यांनी मानले आणि हा सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.





Social Plugin