प्रतिनिधी : प्रा डॉ विजय गायकवाड
अमरावती : अमरावती विभागातील शाळांच्या ऑनलाइन संच मान्यतेमध्ये आढळून येत असलेल्या गंभीर तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे अनेक शिक्षकांना विनाकारण अतिरिक्त घोषित करण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत टीचर्स डेमोक्रेटीक फ्रंट (TDF) च्या शिष्टमंडळाने मा. उपसंचालक (शिक्षण) अमरावती विभाग, सौ. नीलिमा टाके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान अतिरिक्त शिक्षकांचे पदनिर्मिती (Post Creation), प्रलंबित वेतनप्रश्न, अंशतः अनुदानित शिक्षकांचे विविध प्रशासकीय प्रश्न, मान्यता प्रस्ताव, सेवाविषयक अडचणी तसेच इतर अनेक प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ऑनलाइन प्रणालीतील माहिती आणि प्रत्यक्ष शाळांमधील परिस्थिती यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने अनेक शिक्षकांना अतिरिक्त घोषित करण्यात येत असून शाळांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच समायोजन करण्यात आलेल्या अनेक शिक्षकांचे वेतन अद्याप सुरू झाले नसल्याने संबंधित शिक्षक आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करीत आहेत.
यावेळी ऑनलाइन संच मान्यतेची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करणे, ऑनलाइन व ऑफलाइन संच मान्यतेतील तफावत तपासून चुकीच्या संच मान्यता रद्द करणे, शाळांच्या वास्तव परिस्थितीनुसार संच मान्यता निश्चित करणे, तांत्रिक त्रुटी दूर करून पारदर्शक व न्याय्य धोरण राबविणे, शिक्षक संघटनांशी चर्चा न करता घेतलेले निर्णय रद्द करणे तसेच समायोजित शिक्षकांचे प्रलंबित वेतन तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांचाही पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या शिष्टमंडळात टीचर्स डेमोक्रेटीक फ्रंट (TDF) अमरावती विभागाचे संघटक डॉ. प्रवीण बनसोड व निमंत्रक डॉ. प्रशांत विघे, प्राचार्य डॉ. पी.आर. राजपूत, डॉ. शांताराम चव्हाण ,सतीश मोरे, कैलास बाजड, शिवाजी कव्हर, मयूर देव्हाते यांनी केली आहे.





Social Plugin