Ticker

6/recent/ticker-posts

जनता दरबारातील आदेश आणि MIDC च्या नोटिशीलाही केराची टोपली? सरावली-अवधनगरमध्ये अनधिकृत केबल टाकण्याचा प्रकार सुरूच



पालघर प्रतिनिधी : धनेश क्षिरसागर 

९ जून २०२६

पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही कारवाईचा अभाव; नागरिकांमध्ये तीव्र संताप

पालघर बोईसर - सरावली - अवधनगर, येथील एमआयडीसी क्षेत्रात अनधिकृतपणे केबल टाकण्याच्या प्रकारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले असतानाही संबंधित केबलधारकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे समोर आले आहे. जनता दरबारात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एमआयडीसी प्रशासनानेही नोटीस बजावून अनधिकृत केबल हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आजही परिसरात सीडी लावून केबल टाकण्याचे काम सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर हा विषय जनता दरबारात मांडण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना कारवाईचे निर्देश देत नियमभंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने संबंधित केबलधारकांना नोटीस बजावून अनधिकृत केबल काढून टाकण्यास सांगितले होते तसेच आदेशाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला होता.

मात्र, या सर्व घडामोडींनंतरही सरावली-अवधनगर परिसरात काही केबलधारकांकडून उघडपणे सीडी लावून केबल टाकण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन, पालकमंत्री आणि एमआयडीसी प्रशासनाच्या आदेशांना जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, जनता दरबारातील आदेश आणि एमआयडीसीची नोटीस असूनही प्रत्यक्षात कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने संबंधित केबलधारकांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. केवळ नोटिसा देण्याऐवजी प्रत्यक्ष पंचनामा करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याशिवाय, अनधिकृतपणे केबल टाकण्याच्या प्रकारामुळे शासन व एमआयडीसीच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची चर्चा असून, संबंधितांनी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का याची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे. सामान्य नागरिकांकडून किरकोळ नियमभंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाते, मात्र प्रशासनाच्या नोटिशीनंतरही अनधिकृत कामे सुरू राहिल्याने दुहेरी निकष लावले जात आहेत का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.

तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर आणि एमआयडीसीच्या नोटिशीनंतरही कारवाई का झाली नाही, याबाबत संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नागरिकांकडून पुन्हा जनता दरबार, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित शासकीय विभागांकडे तक्रारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

"जनता दरबारात पालकमंत्र्यांनी आदेश दिले, एमआयडीसीने नोटीस दिली, तरीही अनधिकृत केबल टाकण्याचे काम सुरूच आहे. याचा अर्थ संबंधितांना ना शासनाची भीती आहे ना कायद्याचा धाक," अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पालकमंत्र्यांचे आदेश, एमआयडीसीची नोटीस आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही अनधिकृत केबल टाकण्याचे प्रकार सुरूच राहणे हे केवळ नियमभंग नसून प्रशासनाच्या अधिकारालाच खुले आव्हान असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.