Ticker

6/recent/ticker-posts

खासदार संजय देशमुख शिंदे गटाच्या वाटेवर?



यवतमाळ-वाशीमच्या राजकारणात चर्चांना उधाण

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे आणि विविध स्तरांवर सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.महाविकास आघाडीच्या पाठबळावर लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचलेल्या संजय देशमुख यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, तर शिंदे गटातील नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

राजकीय पक्षांमध्ये अनेकदा प्रवास केलेले संजय देशमुख हे आपल्या पुढील निर्णयाने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.मात्र, संजय देशमुख किंवा शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात असून, संजय देशमुख यांचा पुढील निर्णय जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो."यवतमाळ-वाशीमच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. खासदार संजय देशमुख हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी राजकीय वर्तुळात या चर्चांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे."