बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
वडूज आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, या आगारातून 'जिजाऊ' नावाची नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस वडूज ते पुसेगाव-डिस्कळ-मोळ मार्गे फलटण अशी धावणार असून, या नवीन फेरीमुळे या भागातील प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. या नव्या बस सेवेचे पुसेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुपारची फेरी ही बस दुपारी १:३० वाजता वडूज येथून सुटेल. त्यानंतर पुसेगाव, डिस्कळ, मोळ मार्गे फलटणला जाईल. तसेच ही बस पुसेगाव ते डिस्कळ आणि डिस्कळ ते पुसेगाव अशा फेऱ्या मारून पुढे फलटणला मुक्कामी पोहोचेल.सकाळची फेरी दुसरा दिवस फलटण येथे मुक्कामी असलेली ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता फलटणवरून सुटेल आणि पुसेगाव मार्गे सकाळी ८:०० वाजता वडूज येथे पोहोचेल.
परतीची फेरी वडूज येथून पुन्हा ही बस पुसेगाव मार्गे जाईल आणि सकाळी १०:३० वाजता फलटण-पुसेगाव मार्गे वडूजसाठी रवाना होईल.
या नवीन बस सेवेच्या प्रारंभप्रसंगी पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रशासक विशाल जाधव, सुरज जाधव, बाळासाहेब जाधव, सुश्रुत जाधव, सागर भंडारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि एसटी कर्मचारी गणेश मदने , दिनेश तोडकर इत्यादी उपस्थित होते.
या ग्रामीण भागातील अंतर्गत मार्गांवर अनेक दिवसांपासून हक्काच्या आणि सोयीच्या बस फेरीची वाट पाहिली जात होती. वडूज आगाराने 'जिजाऊ' बस सुरू केल्यामुळे प्रवाशांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागातील दळणवळणाला यामुळे मोठी गती मिळणार आहे.





Social Plugin