नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
नांदगाव खंडेश्वर | प्रतिनिधी- गौरव ब्राम्हणवाडे
"घराचे स्वप्न प्रत्येकाचे, आधार शासनाचा हवा;हप्ता वेळेवर मिळाला तरच, सुखाचा निवारा उभा राहावा..."
गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे यांनी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार जुनी घरे पाडून नवीन घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. मात्र विविध टप्प्यांवरील निधीचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेतच थांबली आहेत. परिणामी अनेक कुटुंबांना अपूर्ण घरांमध्ये अथवा तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे पावसाळा अगदी तोंडावर आला असताना या कुटुंबांची चिंता अधिकच वाढली आहे. घरबांधणी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना खासगी सावकार किंवा बँकांकडून कर्ज घ्यावे लागत असून त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. वाढती महागाई, बांधकाम साहित्याचे चढे दर आणि मजुरी खर्च यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.
निवेदनात शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची उद्दिष्टे चांगली असली तरी निधी वितरणातील विलंबामुळे गरीब नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व प्रलंबित हप्ते तातडीने मंजूर करून वितरित करावेत, अडकलेली प्रकरणे विशेष मोहिमेद्वारे निकाली काढावीत आणि पावसाळ्यापूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे. "निवाऱ्याची आस आहे, शासनावर विश्वास आहे; प्रलंबित हप्ते मिळाल्यास, प्रत्येक गरीबाचे घर पूर्ण होण्याचा ध्यास आहे."
या निवेदनामुळे तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून आता प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Social Plugin